-महावीर सांगलीकर
परवा डेक्कन कॉर्नरवर गेलो होतो. तिथं मला सुमित पॉल सर भेटले. हे मुळचे आयरिश आहेत. त्यांना हिंदी, उर्दू, अरेबिक, पर्शिअन, मराठी, इंग्रजी अशा सुमारे 30 भाषा येतात. त्या जुजबी, कामचलाऊ येत नसून त्यातील अनेक भाषांवर त्यांची कमांड आहे. उदाहरण म्हणून सांगतो, त्यांनी कैरो विद्यापीठात हिंदी शिकवलं आहे, तेही हिंदी शिकवणाऱ्या प्राध्यापकांना. यावरून त्यांची बुद्धिमत्ता लक्षात यायला हरकत नाही. असो. त्यांच्याबद्दल मी नंतर विस्तारानं लिहीन.
पॉल सरांच्या बरोबर एक वयस्क गृहस्थ होते. हे गृहस्थ म्हणजे कोणीतरी ग्रेट व्यक्ती असणार हे मी त्यांच्या चेहऱ्यावरनं ओळखलं होतो. पॉल सरांनी मला त्यांची ओळख करून दिली. मी त्या गृहस्थांना हसून नमस्कार केला. मग त्या दोघांना म्हणालो, चला आपण चहा घेऊया. आम्ही चहा प्यायला जवळच्याच एका हॉटेलमध्ये गेलो. तिथं आमच्या गप्पा सुरू झाल्या. गप्पा मारता मारता मी त्या गृहस्थांचं फेस रीडिंग करत होतो. त्यांचं वय 65 च्या पुढं असावं. त्यांनी कोणत्यातरी मोठ्या पदावर काम केलेलं असणार. त्यांचा जन्मांक बहुधा 1 असावा. मी अंदाज बांधत होतो एवढ्यात त्यांच्या कपाळावर दोन्ही भुवयांच्या बरोबर मधोमध एक छोटी उभी, खोलगट आठी पडली. जणू कांही एखाद्या ब्लेडने उभी चीर पाडल्यासारखी. अरे बापरे! याला थर्ड आय म्हणतात. या गृहस्थांना बरंच कांही कळत असणार. विशेषत: ऑकल्ट सायन्समधलं. ही व्यक्ती जिनिअस असणार यात शंका नाही.
मग बोलता बोलता मी त्यांची थोडी माहिती काढायला सुरवात केली. त्यांनी एका कॉलेजमध्ये प्रिन्सिपॉल म्हणून काम केलं होतं. त्यांची जन्मतारीख 28 होती. त्यांचा छंद कम व्यवसाय ज्योतिषशास्त्र हा आहे. त्यांनी ज्योतिष शास्त्र आणि इतर विषयांवर सुमारे 40 पुस्तके लिहिली आहेत. माझे सगळेच अंदाज बरोबर ठरले होते. म्हणजे त्यांचं जिनिअस असणं, वरच्या पदावर काम केलेलं असणं, जन्मांक 1 असणं, ऑकल्ट सायन्सशी संबंध असणं वगैरे.
मी त्यांना विचारलं, सर, भारतीय ज्योतिषी चंद्र राशीनुसार भविष्य सांगतात तर पश्चिमेकडील ज्योतिषी सूर्य राशीनुसार. त्यातली अचूक पद्धत कोणती? ते म्हणाले, दोन्ही पद्धती अचूक आहेत. पूर्व गोलार्धात चंद्र राशीनुसार भविष्य सांगणं योग्य आहे, तर पश्चिम गोलार्धात ते सूर्य राशीनुसार सांगणं योग्य आहे. इतर ज्योतीषांसारखं ‘भारतीय पद्धतच योग्य, पश्चिमेकडील पद्धत चुकीची’ असं, आपलं ते भारी या पद्धतीचं उत्तर त्यांनी दिलं नाही. त्यांच्या या उत्तरानं ते खरोखरच जिनिअस, आप पर भाव नसणारे आहेत याची मला खात्री पटली. मी पटकन उठलो आणि त्यांना वाकून नमस्कार केला. असं अचानक कुणाला वाकून नमस्कार करणं माझ्याकडनं कधीतरीच होतं असतं. कधीतरीच म्हणजे आयुष्यात असं चार-पाच वेळाच झालं असणार!
हे गृहस्थ म्हणजे डॉक्टर चंद्रशेखर चिंगरे!
No comments:
Post a Comment